जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र (२) Lyrics in Marathi

जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय प्रियतम देश महान
रुधिरामधुनी या मातीचा धगधगतो अभिमान

लाव्हाच्या तप्त रसाने घातला जयाचा पाया
सह्याद्री-सातपुड्यांनी घडवली जयाची काया
संतांनी निजकरुणेने भिजवली जेथली माती
अमृतास जिंके ऐशी लेखणी कवींच्या हाती
घरट्यातुन रायगडाच्या घेताच झेप गरुडाने
थरथरली शाही तख्ते धाकाने, प्राणभयाने
मर्दाचे गाइ पवाडे सावेश शाहिरी गाणी
पैंजणांसवे रुमझुमली शृंगाररसाची गाणी
किति समर्थ अमुची भूमी
किति सुंदर अमुची भूमी
उज्ज्वल मंगल या भूमीचे महाराष्ट्र अभिधान

शृंखला तटातट तुटल्या गर्जता कुणी ‘बलवंत’
अन्याय जाळण्यासाठी ‘ज्योती’वर पेटे ज्योत
फुंकली ‘तुतारी’ कोणी समतेची मानवतेची
स्वप्‍नात गुंफली गाणी कुणि भोळ्या ‘फुलराणी’ची
राष्ट्रास्तव लढले येथे स्वातंत्र्यवीर झुंजार
छातीवर झेलत गोळ्या, गळफास मानले हार
समिधेपरि जळले कोणी, करि सबल कुणी अबलांना
कुणि ‘भीम’बळाने केल्या दलितांच्या उन्‍नत माना
हे महाराष्ट्र बलवंता
हे महाराष्ट्र गुणवंता
तुझ्या बळावर कळिकाळाला देऊ अम्ही आव्हान

Leave a comment

Your email address will not be published.