रे हिंदयुवका ! ये पुढे, चल ये पुढे, चल ये पुढे
नव हिंदवी सेनाशतें वघ चालली विजयाकडे
ये स्वर्ग हातीं आपुल्या पडला जरी रणि देह ही
जिंकिता भोगावया ही सापडे तुजला मही
सांगते गीता तुझी तुज शस्त्र घे करि संगरा
अरिकंदना करि वंदुनी योगेश्वरा यदुनंदना
घनगर्जती तोफांतुनी चेतावणीचे चौघडे
धरी धीरता वरिवीरता रणचातुरी चल ये पुढे
जलि जिंकिलें, स्थलि जिंकिलें, युवका तुवां अपुल्याबलें
तव साहसातें भाळुनी गतभाग्य तुजसी लाभलें
चल टाक पाउल तें पुढें, स्फुरुं दे तुझे बाहू जरा
जिंकु ये रणविक्रमें या विश्वव्यापक संगरा
मदधुंद साधनअंध या अधमाधमा गरिमा चढे
अरिसिद्धिही उधळावया चल ये पुढे, चल ये पुढे
अजुनी न सरली ही निशा काळोख भरला अंतरी
तेजाळल्या नुकत्या कुठे क्षितिजी दिशांच्या झालरी
रणरंगणीं तरुणा उडी तूं घेतली जरि या पुढे
चाललो निःशंक आम्ही आपुल्या विजयाकडे
काळेपणाने पूर्ण हे पापात पिवळ्यांचे घडे
घे चाप हाती भारता चल ये पुढे, चल ये पुढे
गीत | – | राजा बढे |
संगीत | – | |
स्वर | – | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | – | स्फूर्ती गीत |