Chan Chan Goshti Marathi Lyrics

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Chan Chan Goshti Marathi Lyrics

1. उंदराची टोपी – Undrachi Topi

एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले.

मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.

उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ‘ राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !’

राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ‘ जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’ शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी भिरकावली.

उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला ‘राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.

2. कावळा – Kavala

एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक कावळ्याचे जोडपे घरट्यात राहत होते. त्याच झाडाखालील बिळात एक साप रहात होता. हा साप त्या कावळ्यांची नजर चुकवून पिल्ले खाऊन टाकी.

दरवेळी असे झाल्याने कावळा-कावळी खूपच दु:खी होते. त्या सापाचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात ते जोडपे नेहमी असे. जवळच एक कोल्हा रहात होता. त्या कोल्ह्याकडे जाऊन सापाचा बंदोबस्त करता येतो का ते विचारण्यासाठी कावळ्याने त्याची भेट घेतली.

कावळा कोल्ह्यास म्हणाला, ”दरवेळी आमची पिल्ले हा दुष्ट साप खाऊन टाकतो. या सापाला ठार मारण्याचा काही उपाय सांगशील तर उपकार होतील.” कोल्हा म्हणाला, ”एखादेवेळी छोटासा प्राणी युक्तीने जी गोष्ट करतो तीच गोष्ट मोठा प्राणीही करू शकत नाही.”

कोल्ह्याने विचार बराच केला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. त्याने ती कावळ्याला ऐकवली, ”एखाद्या नगरात जाऊन श्रीमंत किंवा राजघराण्यातील मौल्यवान वस्तू किंवा दागिना घेउन ये आणि त्या सापाच्या बिळात टाक. ज्याची वस्तू आहे तो तुमच्या पाठलागावर असणारच. बिळातली वस्तू काढण्यासाठी प्रथम सापाला ठार मारतील व आपली वस्तू ते घेऊन जातील.”

कावळ्यातला हा उपाय एकदम पटला. कावळा लगेच जवळच्या राजधानीत गेला. तेथील एका सरोवराजवळ काही राजस्त्रिया स्नान करीत होत्या. स्नानासाठी त्या स्त्रियांनी अंगावरचे दागिने काठावरच काढून ठेवले होते. कावळ्याने एक मौल्यवान हार उचलला आणि उडत जाऊ लागला. त्याच्यामागून राजाचे शिपाई धावत होते.

कावळ्याने तो हार बरोबर त्या सापाच्या बिळात टाकला. ते बघून शिपाई बिळ उकरू लागले. तेव्हा तो साप बाहेर आला. त्याबरोबर त्या शिपायांनी त्याला भाल्याने ठार मारले आणि तो हार घेऊन ते निघून गेले. कावळ्याच्या जोडप्याची चिंता दूर झाल्याने ते खुषीत होते.

उपदेश : काही प्रसंगी शूरांच्या शक्तीपेक्षा क्षुद्राची युक्तीच श्रेष्ठ ठरते.

3. कावळा – चिमणीची गोष्ट – Kavala Chimanichi Goshta

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही.
एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाच. तेही पाण्यात वाहून गेल. हू…हू…हू…हू…! कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवल, चिमणीच घर आहे शेजारीच.

मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’ थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला.

चिऊताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली ‘तू बैस चुलीपाशी’. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर ! कावळयाच्या तोंडाला पाणी सुटले.त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोडया वेळाने पाऊस थांबला. कावळयाने घरटयाचे मागचे दार उघडले आणि तो भुर्रकन् उडून गेला.
असा होता कावळा आळशी आणि लबाड.

4. कावळयाची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस – Kavalyachi Shiksha ani Chimaniche Bakshis

एक होता आळशी आणि लबाड कावळा.

पहिल्या गोष्टीत पाहिला ना? तोच तो.
तो लोळ लोळ लोळला, तर शेणाने भरला.

त्याने वर पाहीले तर त्याचा डोळा फुटला.
त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला.

तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला.
बिचारा रड रड रडला अन् घरी येऊन झोपी गेला.

एक होती कामसू चिमणी.

पहिल्या गोष्टीत पाहिली ना
घर स्वच्छ ठेवणारी? तीच ती.

ती लोळ लोळ लोळली.
तर मोत्याने भरली.

तिने वर पाहिले तर
तिला चंद्रहार मिळाला.

तिने बिळात हात घातला तर
तिला अंगठी मिळाली.

ती देवळात गेली तर
तिला साडी-चोळी मिळाली.

ती साडी-चोळी नेसली, पालखीत बसली
अन् घरी येऊन झोपी गेली.

5. एका गाढवाची गोष्ट – Eka Gadhavachi Goshta

एक धोबी आपल्या गाढवाकडून दिवसभर ओझी वाहण्याचे काम करून घेई आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून देई. रात्रभर गवत, नाही तर कुणा ना कुणाच्या शेतातली धान्याची रोपे पोटभर खाऊन झाल्यावर पहाटे पहाटे ते गाढव आपल्या घरी जाई. या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ह्याशी ओळख झाली.

एके रात्री पुनवेचे पिटूर चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले, ‘कोल्होबा, या चांदण्यांमुळे मन कसे प्रफुल्लित झाले आहे. मी थोडा वेळ गाऊ का?’

कोल्हा म्हणाला, ‘मामा, तुम्ही आणि गाणार? म्हणजे प्रलयच धडकला म्हणायचा!’

‘का रे, मला गाण्याची माहिती नाही, असे का तुला वाटते?’ असा प्रश्न विचारून ते गाढव स्वर किती, सप्तके किती व राग किती वगैरे माहिती देऊन त्या कोल्ह्याला म्हणाले, ‘आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना?

कोल्हा म्हणाला, ‘नुसते ज्ञान असणे वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा. त्यातून कुणी, कुठे व कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शक असे काही नियम आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल, तर खोकला झालेल्याने व जो झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फंदात पडू नये व रोगग्रस्ताने जिभेचे चोचले पुरवू नयेत. खोकला झालेला जर कोणी चोरी करायला गेला आणि चोरी करता करता त्याला खोकला आला, तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा त्याच्यावर प्रसंग येईल, त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाऊ लागलात, तर ज्याच्या शेतातली कोवळी कणसे आपण चोरून खात आहोत, तो शेतकरी जागा होईल आणि आपल्या दोघांनाही चोप देईल.’

गाढव म्हणाले, ‘कोल्होबा, तू अगदीच अरसिक कसा रे? तो स्मशानात राहणारा रुक्ष मनोवृत्तीचा शंकर जर त्या रावणाने सुकवलेल्या स्नायूंपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून रागदारीचे मधुर स्वर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला, तर माझे गोड गाणे ऐकून त्या शेताची रखवाली करणारा माणूस मला मारणे शक्य आहे का? उलट तो माझा सन्मानच करील.’

हा आपले ऐकण्याचे लक्षण दिसत नाहीसे पाहून तो कोल्होबा त्या शेताच्या कुंपणाबाहेर पडून दूर उभा राहिला आणि त्या गाढवाने टिपेत गायला प्रारंभ केला. त्याबरोबर त्या शेताच्या जाग्या झालेल्या राखणदाराने त्याला बेदम मार दिला. त्या माराने ते गाढव मूच्र्छा येऊन जमिनीवर कोसळताच त्या राखणदाराने त्याच्या गळय़ात दोरखंडाने एक उखळ बांधले.

एवढे करून तो पहारेकरी आपल्या झोपडीत जाताच शुध्दीवर आलेले ते गाढव गळय़ात बांधण्यात आलेल्या उखळासह कसेबसे घराकडे जाऊ लागले, तेव्हा दूर उभा राहिलेला कोल्हा त्याला म्हणाला, ‘गाढवमामा, तुमचा दिव्य गायनावर बेहद्द खूष होऊन त्या पहारेकर्‍याने तुमच्या सन्मानार्थ हा ‘भव्य मणी’ तुमच्या गळय़ात बांधला का?’ पण लाजेने चूर झालेले ते गाढव एकही शब्द न बोलता निघून गेले.

6. कोल्हा आणि नगारा – Kolha ani Nagara

एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला.

त्या नगार्‍यावर एका झाडाची फांदी वार्‍यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्‍यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्‍याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल.

त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्‍याचे कातडे कुरतडून फाडले तर… आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या.

उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही.

7. खरी नक्कल – Khari Nakkal

भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.

त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.

भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.
दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.
त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’

बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’

बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या.

8. घामाचा पैसा – Ghamacha Paisa

धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही.

आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल’ मुलाला काहीच कळेना.

तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली.

पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. ‘साहेब, इकडे आणा’. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले.

घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. ‘बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?’
शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, ‘बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.’ स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.

9. चतूर न्यायमुर्ती – Chatur Nyaymurti

एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.

आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, ‘अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?’

जुना मालक म्हणाला, ‘मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.’

या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, ‘तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?’

जुना मालक – होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.

न्यायमुर्ती – तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे.

जुना मालक – (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !

न्यायमुर्ती – ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.’

न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.

10. चल रे भोपळया टुणुक टुणुक – Chal re Bhopalya Tunuk Tunuk

एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्‍या गावाला.रस्त्यांत होते मोठे जंगल. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली.

वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी होती हुषार. ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.’ कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.

म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ‘ वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.

लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ‘ चल रे भोपळया टुणुक टुणुक’.

भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे थांब!’ आतून म्हातारी म्हणाली ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक’. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला.

पुढे गेल्या भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक!’. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.

अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.

11. जंगलचा राजा ! – Jangalcha Raja

एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं…’आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.’अस्वलानं ठरवलं… आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं.

सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं…खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे. माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण…

मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही!

बस्स!! आता ठरलं तर… आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं.

‘मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण…

तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात. अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं… ‘आजच काय तो फैसला करू.

जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता…

‘हा कोण नवीन रुबाबदार राजा?’ असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा… आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण….

सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं… आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं!

12. पोपट – Popat

एका श्रीमंत माणसाजवळ एक पोपट होता. त्या पोपटास त्याने एका मोठय़ा व सुंदर पिंजर्‍यात ठेवले होते. तो त्याला चांगली फळे खायला घालीत असे. त्या पोपटाला तेथे सर्व सुखे अनुकूल होती, तरी ही तो मनात नेहमी झुरत असे. ‘माझे जातभाई जसे मोकळेपणे या जंगलातून त्या जंगलात जातात अन् या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात. तसे मला करायला मिळाले तर किती बरे होईल.’

एके दिवशी चुकून पिंर्ज‍याचे दार उघडे राहिल्याने त्या पोपटाची इच्छा पूर्ण झाली. या पिंजर्‍यातून पोपट घाईने बाहेर पडून लांबच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्याला भूक लागली. तेव्हा इकडे तिकडे पाहू लागला.

चमचमाट, ढगांचा आवाज होऊन पाऊस पडायला लागला. त्या बिचार्‍या पोपटाचे फारच हाल झाले. अशा गोष्टीची त्याला कधीच सवय नव्हती. शेवटी पावसात भिजून व थंडीने काकडून त्याचे तेथेच प्राण गेले. मरता मरता तो म्हणाला. ‘मला जर पुन्हा त्या पिंजर्‍यात जाता आले, तर त्यातून बाहेर पडण्याची मी पुन्हा इच्छा कधीही करणार नाही.’

तात्पर्य : ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान.

13. न संपणारी गोष्ट – Na Sampanari Goshta

एका राजकन्येला गोष्टी ऎकण्याचा भलताच छंद लागला. कुणालातरी तिच्या जवळ बसून सतत गोष्ट सांगत रहावे लागे. परंतू गोष्ट संपली रे संपली की तिला अस्वस्थता वाटायला लागे !

अखेर एकदा राजाने जाहीर केले, ‘जो मनुष्य आतापासून, ते थेट राजकन्येचा विवाह होऊन ती सासरी जाईपर्यंत तिला तिच्या मोकळ्या वेळेत एक न संपणारी गोष्ट सांगत राहील, त्याला मासिक एक हजार सुवर्ण मोहोरांचे वेतन दिले जाईल.’

राजाने राज्यात पिटवलेली ही दवंडी ऎकून राज्यातलेच नव्हे, तर इतर राज्यातलेही अनेकजण तिला गोष्ट सांगण्यासाठी राजवाड्यात आले. पण ताणून ताणून कुणी आपली गोष्ट महिन्या-दोन महिन्यांपेक्षा जास्त ताणू शकला नाही.

एके दिवशी एकजण राजवाडयावर आला व त्याने अशी न संपणारी गोष्ट राजकन्येला सांगण्याची आपली तयारी असल्याचे राजाला सांगितले. राजाने त्याची बसण्याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात राजकन्या त्याच्यासमोर येऊन बसली आणि त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली.-

‘एक होते भातगाव नावाचे गाव. त्या गावात आठ मैल लांबीचे, चार मैल रुंदीचे आणि दोन मैल उंचीचे, भातानी भरलेले प्रचंड मोठे कोठार होते. त्या भाताच्या अवाढव्य कोठारामुळेच त्या गावाला ‘भातगाव’ हे नाव पडले होते.’

शेजारी दुसरे गाव होते. तिकडे चिमण्याच चिमण्या होत्या. म्हणून त्या गावाचे नाव ‘चिमणपूर’ असे पडले होते.’

राजकन्या उत्साहानं म्हणाली, ‘अय्या ! मोठी मजेशीर आहे नाही का ही गोष्ट. पण इतकी मजेशीर असलेली ही गोष्ट न संपणारी आहे ना ?’

गोष्ट सांगणारा म्हणाला, ‘न संपणारी आहे, म्हणून तर मी आपल्याला सांगायला आलोय ना? पण कलावती राजे ! आपण आता मध्येच बोलू नका. मी सांगतोय ती गोष्ट निमूटपणे ऎका.’

याप्रमाणे बोलून तो गोष्ट सांगणारा पुढे म्हणाला, ‘एकदा काय झालं? कशी कोण जाणे, पण भातगावच्या त्या भाताने भरलेल्या कोठाराची चिमणपूरच्या एका चिमणीला बातमी मिळाली ! ती उडत उडत त्या भातगावच्या कोठारापाशी आली त्या कोठाराला पडलेल्या फ़टीतून आत शिरली. तिनं त्या कोठारातला भाताचा एक दाणा चोचीत धरला आणि ती चिमणपूरला उडून गेली !

‘सुहास्यवदनाने चोचीतून दाणा घेऊन घरट्याकडे जाणा-या त्या चिमणीला पाहून दुसरी चिमणी म्हणाली, ‘चिमूताई ! चिमण्यांच्या अफ़ाट संख्यावाढीमुळे गावात अनेक चिमणे चिमण्या अन्नान्न करुन मरत असताना, तू आंबेमोहरी भाताचा हा टपोरा दाणा कुठुन ग आणलास?’ त्या चिमणीनं खर ते सांगून टाकताच दुसरी चिमणी त्या कोठाराकडे गेली व आत शिरुन त्यातला एक दाणा घेऊन स्वगृही गेली!’

‘अय्या ! किती बहारदार त-हेनं सांगता हो ? सांगा सांगा. पुढं काय झालं ते सांगा.’ राजकन्या उत्कंठेनं म्हणाली.

‘पुढं काय सांगायचं ? जे व्हायचं होतं ते झालं ! तिसरी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. चौथी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. पाचवी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. अकरावी चिमणी आली, दाणा घेऊन गेली .. बत्तीसावी… सत्तरावी….एकशे एकावी चिमणी आली, दाणा घेऊन गेली !’

सहनशीलतेचा अंत होऊन राजकन्या म्हणाली, ‘किती च-हाट लावता हो ? कधी संपणार हे तुमचं च-हाट?’

गोष्ट सांगणारा म्हणाला, ‘त्या प्रचंड कोठारातलं धान्य संपेपर्यंत, ते संपूण गेल्याशिवाय मला पुढची गोष्ट सांगताच येणार नाही.’

राजकन्या म्हणाली, ‘मग त्या कोठारातलं धान्य संपवायलाच तुम्ही दहा वर्षे घ्याल.’

गोष्ट सांगणारा म्हणाला, ‘कलावती राजे, तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी जाईपर्यंत तरी काही त्या कोठारातलं धान्य संपून जाण्याची शक्यता नाही.’

यावर राजकन्या राजाकडे गेली व म्हणाली, ‘ मला आजची गोष्ट ऎकत असता, एकंदरीत ‘गोष्ट’ या गोष्टीचा एवढा वीट आला आहे की, यापुढे मला कुणी गोष्ट सांगू नये, आणि मी ती ऎकू नये, असं वाटू लागलंय !’

गोष्ट सांगणा-याने सुरु केलेल्या गोष्टीचे स्वरुप राजाने राजकन्येकडून समजावून घेतले. तो मनात म्हणाला, ‘ गोष्ट सांगणा-याने बनवले असले, तरी त्या च-हाटदार गोष्टीमुळेच वीट येऊन, आपल्या कन्येचा एक अतिरेकी छंद सुटला.’ राजाने या गोष्टीचा आनंद मानला, आणि न संपणारी गोष्ट सांगायला आलेल्या त्या माणसाला त्यानंतर त्याने गोष्ट न सांगताही, मासिक एक हजार मोहोरांचे वेतन सुरु केले.

14. परीस – Paris

एक माणूस परीस शोधायला निघाला…. त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले… महिने लोटले… वर्षे सरली…. पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ….दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा….शेवटी तो माणूस म्हातारा झाला…. आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले… ती साखळी सोन्याची झाली होती….. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही….

तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो…कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने…तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ….. कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो… आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो…… आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो …….

15. पारधी व कबूतर – Paradhi va Kabutar

एका गावाच्या हद्दीबाहेर एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर बरेच पक्षी घरटे बांधून राहात होते. तिकडून येणारे जाणारे लोकसुद्धा त्या वडाच्या सावलीत बसून विश्रांती घेत होते.

त्या झाडावर लघुपतनक नावाचा कावळा रहात होता. एकदा खाण्यसाठी काही मिळते का हे बघण्यसाठी लघुपतनक गावाकडे उडत जात होता. एवढ्यात त्याच्या नजरेस काळाकभिन्न पारधी जाळे घेऊन जात असलेला दिसला.

ते बघून कावळ्याला वाटले, ”हा दुष्ट पारधी वडाच्या झाडाकडेच चालला असणार. म्हणजे आपल्या पक्षी बांधवांवर कदाचित संकट येणार तर….! कावळा तसाच वडाच्या झाडावर परत आला. आणि सर्व पक्षांना म्हणाला, ” हा दुष्ट पारधी धान्य टाकून तुम्हाला जाळ्यात अडकवण्यास येत आहे. तुम्ही धान्य खाण्याच्या मोहाने जर गेलात तर त्या जाळ्यात अडकाल!”

पारधी थोड्यावेळातच त्या झाडाजवळ आला आणि जाळं टाकून बाजूला बसला.
तेवढ्यात चित्रगीव नावाचा कबूतरांचा राजा आपल्या परिवारासमवेत अन्नाच्या शोधासाठी आकाशातून उडत होता. त्याच्या नजरेस पारध्याने टाकलेले धान्य दिसले. तेव्हा लघुपतनक त्या चित्रग्रीवाला ‘नको नको’ म्हणत असतानाही चित्रग्रीव आणि कुटुंबीय त्या धान्यावर तटून पडले. खरं म्हणजे चित्रग्रीव स्वत: ‍अतिशय हुशार आणि चाणाक्ष पण चित्रग्रवीच्या नशिबातच संकट असल्यास त्याला तो तरी काय करणार?

चित्रग्रीव आपल्या कुटुंबीयांसकट त्या जाळ्यात अडकला. बरीच कबुतरे जाळ्यात अडकल्याचे बघून पारधी खूष झाला. त्या कबुतरांना मारण्यासाठी पारधी काठी घेऊन धावत आला. त्या बरोबर चित्रग्रीवाने सर्व कबुतरांना जोर करून जाळ्यासकट उडण्याचा आदेश दिला.

त्याबरोबर जाळ्यासकट कबुतरांनी आसमंत गाठला. पारधी त्यांचा पाठलाग करू लागला, तशी कबुतरे वेगाने उडू लागली. शेवटी पारधी स्वत:च्या नशिबाला दोष देत मागे फिरला.

पारध्याच्या संकटातून पार पडल्याचे लक्षात येताच चित्रग्रीव म्हणाला, ”हिरण्यक नावाचा एक उंदीर माझा मित्र आहे. आपल्याला मोकळं करण्यासाठी त्याची मदत होईल.”

हिरण्यक एका टेकडीच्या बिळात रहात होता. तिकडे पोहोचल्यावर चित्रग्रवाने हिरण्यकाला मदतीची हाक दिली. त्याबरोबर हिरण्यक धावत आला. चित्रग्रीवाने घडलेली हकीगत सांगून जाळ्याचे पाश तोडण्याची विनंती केली. हिरण्यकाने मित्रप्रेमखातर आणि संकटात सापडलेल्यास मदत करण्याच्या वृत्तीने चित्रग्रीवास मोकळा करू लागला. तेव्हा चित्रग्रीवाने हिरण्यकास सांगितले की, ”आधी माझ्या परिवारचे पाश तोड. आपल्या प्रजेला संकटात ठेवून राजाने सर्वांच्या आधी संकटमुक्त होणे योग्य ठरणार नाही. म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे कृती कर.”

हिरण्यकाला चित्रग्रीवाचे विचार ऐकून खूप आनंद झाला. हिरण्यकाने चित्रग्रीवाच्या परिवाराला आधी मोकळे केले आणि नंतर चित्रग्रीवास मोकळे केले. चित्रग्रीवाने हिरण्यकाचे आभार मानले असता, हिरण्यक उद्गारतो, ”कधी संकट आले तर मला जरूर हाक मार. मी मदतीला धावून येईन.”

तात्पर्य : संकटसमयी जो मित्र धावून येतो तोच खरा मित्र.

16. प्रामाणिक पहारेकरी – Pramanik Paharekari

एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते.
‘ आता काय करायचं ?’ असा
प्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला.

पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता.

गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, ” कोण आहे रे पलीकडे ? दार उघड. ”
” तुमी कोण हायसा ? ” पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं.
पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले, ” आम्ही महाराज आहोत. ”

पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय.

तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, “आरे, उघड की दरवाजा. ”
” तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाय सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या सुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढ कळना व्ह्य. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते. ”

महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली.

सकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं.

पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.

पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, “तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. ”

17. बुड घागरी – Bud Ghagari

बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले.

माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणतो दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’.

इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत.’

मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही.

मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही.

आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.

18. बेडूकमामा – Bedukmama

पावसाळा आला पाऊस पडू लागला
सगळी जमीन भिजून गेली
जिकडे तिकडे हिरवेगार गवत रुजले
रामजी पाटील शेतात काम करीत होता.

शेताजवळच पाटलाची झोपडी होती.
सायंकाळी पाटील घरी आला.
तो काम करून दमला होता
झोपडीत येताच तो खाटेवर पडून राहिला.

बाहेर पाऊस पडतच होता
झोपडीच्या जवळच तिची तीन पिले होती
पावसामुळे पिलांना आनंद झाला
ती ‘डराव डराव’ करून ओरडू लागली.
बेडकी म्हणाली,
‘बाळांनो, पाटील दमला आहे
तुमचे ओरडणे ऐकून तो रागावेल,
व आपणाला मारेल
यासाठी ओरडू नका.’

दोन पिलांनी आईचे ऐकले
पण तिसरे ‘डरांव डरांव’ करतच राहिले
पाटलाला ती कटक’ आवडली नाही
तो खूप रागावला
आणि इकडे तिकडे पाहू लागला
जवळच एक बेडूक ‘डरांव डरांव’ करीत आहे,
असे पाटलाला दिसले.
पाटील उठला
बेडकापाशी आला
मग पाटलाने बेडकास पकडले,
व जोराने भिरकावून दिले
बेडूक एक दगडावर आपटला व मेला.

19. मांजराच्या गळ्यात घंटा – Manjarachya Galyat Ghanta

एका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे. अशा खादाड उंदारांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदारांने विचार केला की या उंदारांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल.

हा विचार करत दुकानदाराने एक दिवशी एक मांजर दुकानात आणली. ‍ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येईना. मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची. त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. उंदीर आता फार काळजीत पडले. त्यांनी मांजरीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक सभा बोलवली.

सभेत याच्यावर वरीच चर्चा झाली. पण मांजराचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणालाच समजेना. थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला, मांजर अगदी हलक्या पायाने व अत्यंत चपळपणे फिरते. त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच ती आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडले जाण्याची भीती लागलेली असते. तेव्हा एक तरूण उंदीर म्हणाला की काही करून आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे.

सगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला. एक उंदीर म्हणाला की छान हं मांजर चालायला लागली की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊन तिच्यापासून दूर पळून जाऊ. सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदरांला स्वतःच्या हुषारीचा फार अभिमान वाटला. तेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला, थांबा हा वेडेपणा आहे. मला एवढेच सांगा मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. तितक्यात मांजर तेथे आली व तिने एका उंदरावर झडप घातली.

उपदेश : अमलात न येणारा उपाय कुचकामी ठरतो

20. राक्षस, चोर आणि ब्राह्मण – Rakshas, Chor ani Bramhan

एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या.

दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.

द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना ‘तू कुठे अन् का जातोस,’ ते विचारलं.

चोर म्हणाला, ‘मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?’ अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे.

झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!

तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू?
राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली.

त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला.

तात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment